माझी जयश्री ताई
परमेश्वर हा चौसष्ट कलांचा निर्माता आहे ,चित्रकला हि एक प्रमुख कला आहे ,चित्रकार म्हणून उत्तमोत्तम चित्र रेखाटतो ,मन लावून तो चित्र काढतो ,त्या उत्तमोत्तम चित्रातले एक चित्र म्हणजे माझी जयश्री ताई ,हा परमेश्वर तसा मोठा मुडी कलाकार आहे ,कधी कधी आपल्या ह्या कामाला तो कंटाळतो आणि माझ्यासारखी व्यंगचित्र काढून पृथीवर पाठवतो.
जयश्री ताईच्या आठवणी म्हणजे एक लखलखीत बुद्धिमत्तेची आठवण ,तिचा बालमोहनची विद्यार्थिनी ते मुंबई विद्यापीठाची स्नातक म्हणून केलेला प्रवास असाच पावला पावलावर आपल्या अजोड बुद्धिमत्तेची जाणीव करून देणारा होता ,शालेय शिक्षणात नेहमीच अग्रक्रमी राहूनही ती पुस्तकी किडा म्हणून कधीच राहिली नाही ,चिव चिव करणारी चिमणी म्हणून कधीच वावरली नाही ,तिची आवड निवड गरुड झेपेचीच होती ,मराठी ,इंग्लिश,आणि संस्कृत ,ह्यातिन्ही भाषांवर तिचे प्रभुत्व होते ,अभ्यासाचे एकही क्षेत्र नव्हते कि तिला माहित नव्हते ,उत्तम संस्कार ,आणि आणि बहुश्रुत बुद्धिमत्तेच्या पायावर ठाम पणे ती उभी होती , तिच्या आत्म विश्वासाला तोड नव्हती ,जे जे चांगले आहे सुंदर आहे तेते माझ्यासाठी आहे आणि तेते मी माझ्या स्वतःच्या हिंमतीवर मिळवणार ,हि विजगेषु वृत्ती तिनी कायम जोपासली . ती पाले करांची लाडकी मुलगी होती ,कुमारदादाची लाडकी बहीण होती अनेक वलयांकित व्यक्तीशी नात्याने ती निगडित होती ,पण तेव्हाही तिने आपली ओळख जयश्री पालेकर हीच आहे हे पक्क ठरवले असावे नाहीतर एवढा प्रथम पुरुषी एकवचनी आत्मविश्वास जोपासणे हे कठीण असते ,पण तिच्या डिक्शनरीत कठीण हा
शब्दच नव्हता ,स्वयंप्रज्ञ आत्मविश्वास हे तिचे संचित होते ,स्वतः जोपासलेले ,वाढवलेले.
माझ्या लहापणी मी आजोळी शिवाजी पार्कला राहत होतो शैला मावशी ,ज्योत्स्ना मावशी आणि जयश्री ताई या तीन देवीयांनी माझ्या योगक्षेमाचा जिम्मा घेतला होता ,या तीन शिक्षकांच्या निरीक्षणाखाली माझे बालपण सुखाने व्यतीत होत होते ,लहान पण पासून मला वाचनाचा भस्म्या रोग लागला होता 'मिळाले पुस्तक वाचून टाक असा माझा खाक्या होता ,ह्या पुस्तकात अभ्यासातली पुस्तके कधी कधीच पुसटपणे उमटत होती .
आमच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन म्हणून एक प्रकरण असायचे ,एकदा भग्न शिवालयाचे मनोगत असा विषय होता तो लिहिताना मी फार आगाऊ पण केला होता ,ब. भ . बोरकरांच्या भावीण पासून चंद्रकांत काकोडकरांच्या पित कादंबऱ्या पर्यंत ची वाटमारी केली होती ,माझा निबंध मी लिहिला आणि जयश्री ताईला दाखवला वाटलं कौतुकाची थाप पाठीवर पडेल ,पण जयश्री ताईने तो कागद वाचला आणि शांतपणे फाडून टाकला आणि म्हणाली शशांक नकोते वाचतोस आणि नको ते लिहितोस ,लिहिताना वयाचे भान ठेव आणि वाचतानाही ,लहान आहेस तू अजून ,मला उगीचच तिचा राग आला निबंध फाडून तिनी एका भावी चंदकांत काकोडकरांची भृणूहत्या केली ,पण त्या एका शिक्षेने मला वयाचे भान आले पचेल तेव्हडेच खावे आणि सर्वात वाचता येईल तेच लिहावे हा पाठच ते क्षण देऊन गेले होते जयश्री ताईची बुद्धी आणि तिचा अविष्कार हि पांचालीची अक्षय थाळी होती सर्वांच्या उत्तरे देणारी ,तिचा अभ्यास ,अनेक विषयातली तिची गती ,सर्वच काही अगम्य आणि अतर्क्य ,एका शब्दातच सांगायचे झाले तर देवदत्त .,
तिच्या आयुष्यातलय अनेक प्रवासाचा लेखाजोखा करताच येणार नाही सारे काही चकचकीत आणि लखलखीत ,बालमोहची विद्यार्थिनी ते आसाममधल्या शाळेतील मुख्याधिपिका ,विमलताईंची मुलगी ते रुपा आणि रणजित ची आई ,माहेरी चहाचा कप हि न करणाऱ्या मुली पासून अन्नपूर्णेनेही हात उसने मागावे इतके रुचकर आणि वैविध्यपूर्ण स्वयंपाक रांधणाऱ्या गृहणी पर्यंतचा प्रवास सारेच आत्त्मविश्वास आणि बुद्धिमत्तेची झालर लावून आलेले हे संचित देवदत्त नाही म्हणायचे तर काय म्हणायचे
आपण शेजारी निवडू शकतो पण नातेवाईक निवडू शकत नाही ,तुमच्या पूर्वसंचितावर ते अवलंबून असते नाहीतर माझ्यासारख्या सुमार आणि सामान्य माणसाला जयश्री ताई सारखी ताई कशी मिळाली असती उत्तर एकाच पूर्वजन्मीचे पुण्य .
तिच्या आठवणींना उजाळा द्यायच्या सोहळ्याला आपण जमलो आहोत माझ्या मनातल्या आठवणींचे वेडेवाकडेका होईना मी चित्र काढायचा प्रयत्न मी केला आहे गोड मानून घ्या ,हे शब्दांकन माझ्या जयश्रीताई कडे पोहचले असेल
पहिलीतल्यापुस्तकातल्या सरस्वती सारखा चेहरा असलेली माझी ताई म्हणत असेल छानच लिहले आहेस शशांक कीप युअर पेन फ्लोइंग ,हा आशीर्वाद पुरेसा आहे.
शशांक रांगणेकर
