इंदुताई आणी गुरुदास मामा


साठीचे  दशक ,  आईच्या नावाने एक पोस्टकार्ड न चुकता  मकरसंक्रांतीच्या आसपास  यायचे ,तेव्हा पत्रव्यवहार फक्त  प्रथमपुरुषीएकवचनानेच  व्हायचा , पण आईला येणारे हे पोस्टकार्ड  मात्र सौभाग्य लेणी लेउनच मिरवायचे.,

"अमुक अमुक दिवशी आमच्या कडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम योजला आहे तरी आपणआपल्या मैत्रिणी लेकी सुना ह्यांना घेऊन जरूर यावे  आपली नम्र "सौइंदुमती गुरुदास  फेणे.ते पत्र  काही माझ्या संग्रहि  नाही पण  आठवणीत मात्र   कायमचे आहे .आजच्या  मराठीत  सांगायचे झाले तर हार्ड  कॉपी  नसली तरी सॉफ्ट कॉपी मात्रअजूनही रेकॉर्ड  वर आहे, इतक्या दशकांनंतरही डीलीट  न होता राहिली  आहे .

इंदुताई माझ्या आईची  भाची  तिच्या मावसबहिणीची आवडूताईंची मुलगी ,आणि तिच्या मावसभावाची  गुरुदास भाऊंची बायको , आणि समवयस्क असल्याने जिवाभावाची मैत्रीण .माझ्या आईची आणि इंदुताईची  मैत्री अतूट होती,आपली मैत्रीण आणि नणंद ह्या दोनीही नात्याने  दोघीही एकमेकींच्या भावबंधनात त्या गुंतल्या होत्या,

गुरुदास फेणे हे फेण्यांचे  माझ्या आईच्या मोठ्या  मावशीचे  सावाक्काचे  चतुर्थ चिरंजीव आणि इंदुताई  हि माझ्या आईच्या दुसऱ्या मोठ्या मावशीच्या कावाक्काच्या (कसबेकर )जेष्ठ  कन्यकेची  आवडूताईं  गंडभीरांची  ची मोठी मुलगी, कारवारी नात्याचे गुंते ,अगदी गुंतागुंतीचे  असतात सोडवू  म्हंटले तरी सुटत नाही आणि तोडू म्हंटले तरी तुटत नाहीत. 


गुरुदासभाऊ   आजच्या भाषेत सांगायचे झाले  तर एक उद्योजक होते , त्याकाळी  त्याला समानार्थी शब्द खटपटी आणि हरहुन्नरी  चलाख धंदेवाईक असा होता. फेण्यांकडून वारसाहक्काने आलेली बुद्धिमत्ता  आणि एक पर एक फ्री  म्हणून परिस्थितीने दिलेली व्यवहारचतुराई   परिस्थतीशी दोन हात  करण्याची प्रचंड  ताकत , आणी    युयुत्सु वृत्ती ह्यांच्या जोरावर  आज  कुठल्याही वृत्तपत्रात पेज थ्री  सेलिब्रेटी म्हणून नक्कीच झळकले असते पण  काळ वेगळा होता ,त्यांच्या उंचीची मोजमापे  घेणारी पट्टी कदाचित  आमच्या समाजात उपलब्ध  नव्हती हेच खरे  त्याचे व्हावे तितके कौतुकआणि वेळप्रसंगी,द्यावा लागणारा आर्थिक नैतिक आणि सामाजिक  पाठिंबा आमचा चाकरमानी समाज देऊ शकला नाही, तरुण उद्द्योजक हा शब्द तेव्हा आमच्या समाजात जन्माला यायचा होता ,आयुष्याच्या वाटेवर टप्पाटप्प्याने वर चढणाऱ्या समाजाला हि बुभुत्कारी हनुमान- उडी  जमलीही नाही आणि पचलीही नाही,,मनात विचार येतो कि प्रचंड ताकदीच्या  ह्या माणसाचे नाव गोवर्धन  भाई असते तर  कदाचित हे चित्र वेगळे दिसले असतेपण ह्या असते नसते ह्याला काहीच अर्थनसतो पण तरीही मनातली सल मात्र कायम राहतेउद्यमशीलतेचा   परिस स्पर्श  लाभलेल्या ह्या माणसाचे व्हावे तितके कौतूक  झाले नाही.

यश हे मोठे पणाचे नक्कीच गमक नाही,कारण मोठेपणाचे मोजमाप करताच  येत नाही ,गुरुदास मामाच्या मोठेपणाची उंची मोजणारी पट्टी तेव्हा हि नव्हती आणि आजही नाही . गुरुदासभाऊ  आणि  इंदुमती हे एक आदर्श जोडपे होते ,फेण्यांचे प्रथमपुरुषीव्यक्तिमत्व आणि गंडभिरांची  ओसंडून वाहणारी माया , ममता ,ह्यांचे एक अजोड रसायन .
 माझ्या लहानपणी ह्यांच्या आभाळमायेची उब मीही अनुभवली आहे अमरहिंद मंडळ  च्या जवळ असलेल्या त्यांच्या घरात मी बऱ्याचदा  राहिलो आहे प्रत्येक वेळी मिळणारी मायेची  साय आणि कौतुकाची थाप  खाल्ली आहे त्या घरातजाताना  मामाच्या गावाला जाऊया  अशीच भावना मनात प्रगट  व्हायची ,काहीच दिवसापूर्वी कळले कि इंदुताई वारल्या ,आईच्या डोळ्यातले अश्रू तिने  हळूच पुसले मी मात्र डोळे हलवले सुद्धा नाही कारण माझ्या डोळ्यसमोर  अजूनही तेपत्र  दिसते आहे "आपली सौ इंदुमती गुरुदास फेणे "हे नाव सांगणारे,आपुलकी ,प्रेम आणि माया ह्या  सवंगड्याना बरोबर घेऊन येणारे
,गुरुदास मामा नाहीत ,इंदुताई आताच गेली ,पण त्यांनी आपल्या वागण्यातून  दाखवलेला   नाते ह्या शब्दाचा अर्थ मात्र कायम आहे , तो अर्थ मलाच नाही तर प्रत्येकाला सांगतो कि तू एकटा नाहीस आम्हीही तुझ्याबरोबरच आहोत. 
,,
शशांक
९८२१४५८६०२
 , 

  


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे