शैला मावशी एक अपराजिता
शैला मावशी एक अपराजिता माझ्या आजीची अपाकाची धाकटी बहीण अंबा मावशीचा सत्तेचाळीस साली अचानक टायफईडने मृत्यू झाला. नवरा ,एक मुलगा आणि दोन मुलींना सोडून अंबामावशीला भरल्या ताटावरून उठून जावे लागले होते. टायफईडला त्या काळी पर्यायी शब्द फक्त मृत्यूच होता ,अनेक घराच्या चुली ह्या रोगाने थंडावल्या होत्या. शिवाजी पार्कच्या एम .बी राउत रोडवर बरीच स्वयंपाकघरे थंडावली होती. "माय मरो पण मावशी जगो "हि मराठी भाषेतली एक कमनशिबी म्हण , कमनशिबी अश्यासाठी म्हणायची कि हीच खरा अर्थ कुणाला कळलाच नाही ,आईला मर आणि मावशीला शतायुषी भव असे हि म्हण सांगत नाही ,तर ती सांगते की आईच्या प्रेमाइतकच किंबहुना काकणभर अधिकच मावशीचे प्रेम सरस असते ,कारण त्या प्रेमात बहीण आणि तिचे अपत्य ह्या दुप्पट मायेची साय असते ,अंबामावशीच्या मुलांची काळजी घ्यायला तिची मोठी बहीण माझी आजी अपाका धावून आली. अपाकाचे नाव लग्नात बदलले आणि दुर्गा ठेवले ,...