अरविंदमामा
कैलासवासी ,दिवंगत , असे शब्द काही व्यक्तीचा उल्लेख करताना आपण वापरूच शकत नाही कारण त्यांनी तुमच्या मनाच्या आलबम मध्ये त्यांचा जिवंत फोटोच चिकटवलेला असतो ,त्या फोटोला मनातल्या मनात का होईना हार घालण्याची हिंमतहि होत नाही कारण हार फक्त मृत व्यक्तींच्या फोटोला घालतात आणि काही माणसे तुमच्या साठी कायमचीच जिवंत असतात ,अरविंदमामा हे असेच एक जिवंत व्यक्तिमत्व.
अरविंदमामा माझ्या आईचा भाऊ ",सक्खा की मावस कि चुलत हे शब्द फेणे बोरकर कुटुंबात कधीच वापरातच नसतआणि ,कारण ते मनातही येत नसत भाऊ अथवा बहीण , मोठा कि लहान हाच फरक असायचा ,तो फरक शब्दातच दृग्गोचर व्हायचा .
आपला हा समवयस्क भाऊ आईला फार जवळचा वाटायचा ,काहीकाळ मुंबापुरीत राहून हा भाऊ तिच्या जवळ"मुंबैक घरार घरे आसात"म्हणून सांगायचं तेव्हा त्याचा थोडासा हेवाही वाटायचा ,तिच्या मनातली त्याची लहानपणातली प्रतिमा तिने कायमची जपून ठेवली होती ,आणि त्या आठवणींच्या रमलखुणा वारंवार तिच्या शब्दातून उमटायच्या . हा आता सांगितलं तो आईचा भाऊ ,पण माझा अरविंद मामा मात्र अनेक वेगवेगळ्या छटात मी बघितला आहे .
माझ्या मनातली अरविंद मामाची प्रतिमा एका लढवय्याची आहे ,शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती म्हणणाऱ्या कणखर व्यक्तिमत्वाची आहे ,भय भीती हे शब्द विसरून गेलेल्या माझ्या ह्या मामाची आठवण माझ्यासाठी एक यशोगाथाच आहे ,अनेक आर्थिक त्सुनामीना पराभूत करणारा हा ताठ कण्याचा माणूस आणि जोगेश्वरी ते शिवानन्द सोसायटी पर्यंतची त्याची वाटचाल , मनातली बरिचशी जागा व्यापून राहिली आहे. हा माणूस ताठ कण्याचा होता पण ताठर नव्हता ,सगळ्याशी कसे जुळवून घ्यायाचे ह्याची कला त्याला अवगत होती ,विनोदी होता तरीही विदुषकी नव्हता ,अंतर्बाह्य निर्मल आणि सरळ ,कित्येक वर्षे सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर राहूनही सर्व सभासदांना आपलासा वाटणाऱ्या ह्या माणसाच्या यशाचे गमक त्याच्या सुकृत विचारात होत,काही माणसे स्वयंप्रकाशी असतात ,त्यांच्या गुणांची आणि कर्तृत्वाची मोजणी करणारी मापे आपल्याकडे नसतात हेच खरे . मला बऱ्याच वेळी वाटते कि साहित्य आणि इतिहास ह्यांनी आमचे आयुष्य नको तेवढे व्यापले आहे ,म्हणूनच आमचे लक्ष ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घ्यावी अश्या आपल्या माणसांकडे जात नाही आणि त्यांचे योग्य मूल्यांकन आपण करू शकत नाहीत. कारवारात सांगायचे झाले तर "शेजारची होक्कल कुड्डी .
सुमन मामी हि अरविंद मामांची पत्नी 'अतिशय शांत आणि मनमिळाऊ ,दैवी गुणांचा वारसा माहेरहून घेऊन आली आहे. हसतमुख समाधानी चेहऱ्याचे कमळ सदैव चेहऱ्यावर फुललेले असते. हिची आठवण आली कि देवी जिवती आठवते,अनेक सीकेपी घरात मी तो फोटो बघितला आहे ,का कोण जाणे तो बघितला कि सुमन मामी आठवते ,मातृप्रेमाची शेलारी पांघरून आलेल्या जन्मदेच्या रूपातच हि दिसते ,हिने लावलेली सुकी काडीही फुलते फळते ,ईश्वरीय गुण म्हटतात हेच असावेत.
अपत्यसुख हा एक फसवा शब्द ,अपत्य झाले म्हणून त्याच्या प्राप्तीचे सुख चिरस्थायी असते असे नाही ,प्रसव वेदनेच्या वे,ळेलाही न होणाऱ्या वेदना मुले जन्मदात्यांना देतात. पण पूर्व संचित नावाची गोष्ट विसरता येत नाही ,भारत,सदाशिव ,दौलत,आणि उज्वला ह्यांना बघितल्यावर कळते की शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अपत्यसुख ते हेच.
अरविंदमामा आणि भाऊमामा (कालिदास बोरकर)ह्यांची मैत्री अविरत होती कारवारच्या मास्तरवाड्यात जन्माला आलेली आणि via जोगेश्वरी पार्ल्याला स्थिरावलेली हि मैत्री मनाने मात्र कारवारातच घोटाळत असायची ,हि नाती जन्मजन्मांतरीचा असावीत ,
अरविंद मामाची विजागेषु वृत्ती मी अनुभवली आहे , तो आजारी असताना मी त्याला भेटायला गेलो होतो ,स्वरयंत्रावर परिणाम झाल्याने तो बोलू शकत नव्हता ,सर्वांकडे नुसते बोलणारच नव्हे तर इतरांनाही बोलके करणारा माझा मामा अबोल झाला आहे हि कल्पनाही मला सहन होत नव्हती ,मी त्याच्या जवळ बसलो होतो ,त्याच्याकडे बघायची माझी हिम्मत होत नव्हती अक्युप्रेशरचे काही पॉईंट्स मी त्याला देत होतो ,माझे लक्ष हळूच त्याच्या चेहऱ्यावर गेले ,दुःखाची पुसटशी छटाही त्याच्या चेहऱ्यावर नव्हती ,तोच जिवंतपणा तीच जितंम मया म्हणणारी विजागेषु वृत्ती सूर्यप्रकाशासारखी चेहऱ्यावर लखलखत होती. मनात विचार आला हा दैवी चमत्कार तर नव्हे , मग लक्षात आले कि ह्यात दैवाचा काहीच भाग नाही माझ्या मामाची वृत्तीच अशीच आहे हार न मानणारी मृत्यूच्या दारात जाऊनही त्याला वाकुल्या दाखवणारी. शाळेतल्या कवितांची आठवण अजूनही मनात पालवते 'आठवते आहे आहे कुसुमाग्रजांचे कोलम्बसचे गर्वगीत "अतूट आमुची इच्छाशक्ती किनारा तुला पामराला.
श्रद्धांजली मृत व्यक्तीसाठी असते , हि श्रद्धांजली नाही हि एक आठवण आहे ,आनंद चित्रपटातले एक अमिताभचे एक वाक्य आठवते "आनंद कभी मरते नही". ही एक आठवण आहे माझ्या स्वतःच्याच मनाला जिवंत ठेवणारी.
शशांक