एक अमरवेल


संस्कृत मध्ये मुलीला एक सुंदर शब्द आहे "दुहिता" आणि अर्थ आहे जी दोनीही घरांचे  म्हणजे  सासरच्या आणि माहेरच्या हितांचे रक्षण करते ती  ,तारेवरची कसरत असते कधी तोल चुकेल ते सांगता येत नाही. हि तारेवरची कसरत  माझ्या मावशीने विमलताईने   पार पडली .

विमलताई हि माझी मावशी ,सावा काची  मुलगी माझ्या आईची मावस बहीण ,ती  शिवाजी पार्कला आमच्या शेजारी राहायची. मी माझ्या लहानपणी माझ्या आजोळी राहायचो ,विमलताई ,शंकर भावोजी ,कुमारदादा,आणि जयश्री ताई ,असे चौकोनी कुटुंब , कुटुंब चौकोनी असले तरी कुटुंबाच्या कक्षा फार मोठ्या होत्या ,सगळ्यांना सामावून घेणारे कुटुंब म्हणुन  मान्यताप्राप्त होते .

शंकर भावोजी कस्टम  मध्ये उच्च  हुद्द्यावर होते , एक स्वच्छ  हुशार आणि निर्भीड अधिकारी  अशी  त्यांची ख्याती होती ,त्यांच्या ह्या  स्वभाव गुणाचे त्यांना तोटे सोसावे  लागले पण त्यांची प्रतिमा मात्र निष्कलंक राहिली. मला वाटते त्यांच्या ह्या  संचिताचे फळ म्हणजे  त्यांच्या चेहऱ्यावर  कायमचे झळाळणारे तेज आणि सामाजिक मान्यता.  ,शंकरभावजी सेवानिवृत्त झाले तेव्हा पुडुचेरीचे डेप्युटी  कलेक्टर होते. आयुष्यभर  तळ्याकाठी राहूनही घोटभरही पाणी न चाखणारा हा पुरुषोत्तम  खऱ्या अर्थाने  संत प्रवृत्तीचाच होता ,संत म्हणजे काय तर सत प्रवृत्तीचा माणूस ,त्यासाठी टिळे माळे  लावून टाळ  कुटत  राहणं  नव्हे तर सत प्रवृत्तीचा माणूस तो संत ,मग तो धोतरातला असुदे कि शर्ट प्यांटीतला असुदे ,शंकर भावोजींची वृत्ती आणि प्रवृत्ती  संतांचीच होती. मी माझ्या लहानपणी ह्या दोघांना जवळून पहिले होते पण ते किती मोठे होते त्याचा अर्थ आज लागतोय ,,माझे बालपण त्यांच्या संगतीत फुलात गेले ,मला वाचनाची गोडी त्यांनी लावली ,जगाच्या ज्ञानाच्या  खिडक्या त्यांनी उघडल्या ,"वाचाल तर वाचाल "हा फुल्यांचा संदेश माझ्या वाचनाला मदत करून  नकळत माझ्या मनावर बिंबवला ,"अमृत ,हंस किर्लोस्कर सारखी मासिके ते मला न चुकता वाचायला द्यायचे ,शंकरभावजींचे उपकार  मी विसरू शकत  नाही .

परमेश्वर हा फार मोठा लहरी  चित्रकार आहे ,एकाच साच्यातली  माणसाची चित्रे तो सतत काढत असतो ,कधी कधी विनोद वृत्ती जागृत झाली तर माझ्या सारखी व्यंगचित्रेही तो काढतो ,पण विमलताईंचे चित्र काढताना त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल. मानवी चांगुलपणाचे जेजे काही ठोकताळे आहेत त्याचे बेलमून चित्रण  त्यांनी तिच्या चित्रणात केले होते.

माझी आजी अपाका तिची  मावशीहि  होती  आणि   मैत्रीणही ,आणि सक्खी शेजारीही होती ,वयातले किंवा नात्यातले अंतर  त्यांच्या मध्ये आडकाठी करून गेले नाही  गेले नाही. आपल्या नात्यातल्या सर्वांसाठी  मग ते नाते कुठले ही असो  त्यासाठी सतत कार्यरत राहणे हा त्यांचा कार्यभाव होता .

 अनेक नातेवाईकांची वर्दळ विमल ताईच्या घरात होती ,आपल्या भावंडांचेच नव्हे तर नणंद दिरांचेही   आगत स्वागत करणारी विमलताई मी बघितली आहे ,नात्याच्या प्रत्येक धाग्याचा उभा आडवा ताणा  बाणा  ती पकडून होती,
अखेर नाते  नाते म्हणजे काय ह्याचा नेमका अर्थ तिला लागला होता. " न इति म्हणजे इतकेच नव्हे तर ह्या पेक्षा कितीतरी अधीक  हा तिचा नात्याचा अर्थ होता . नवरात्रात देवी नऊ रूपात प्रगट  होते पण विमलताईंची अनेक रूपे मी बघितली आहेत ,रायमामा दर शनिवारी विमलताईंकडे जेवयायाला यायचे  त्यावेळी भोज्येषु माता दिसणारी विमल ताई मी बघितली आहे ,शंकभावजींबरोबर क्लब मध्ये जाणारी मॉडर्न  विमलताई संकष्टीला गणपतीची मनोभावे पूजा करणारी नउवारीतली  विमलताई ,  .,तिच्याच नव्हे आम्हा सर्व मुलांना शिस्त लावणारी ,भावंडाना साहाय्य करणारी आणि वेळ प्रसंगी धावून जाणारी विमल ताई ,तिच्या भावाचा बाळा भाऊंचा मुलगा बाबू गेल्यावर विमानाने हैद्राबादला जाणारी विमलताई ,विमलताईंची अगणित रूप मी बघितली आहेत. देवी पुराणात देवीचा उल्लेख  बहुरूपिणी असाआहे  किती सार्थ आहे तो.

सुख आणि दुःख कोणाच्याही आमंत्रणाची वाट पाहत नाहीत एखाद्या आगंतुक पाहुण्यासारखी  ती कोणाच्याही घरी जातात ,विमलताईंनी ह्या सगळ्या प्रसंगांना धीराने तोंड दिले सुखाने हुरुळली  नाही आणि दुःखाने कोलमडली  नाही ,, आपले काम ती करतच राहिली ,महाभारतातल्या तिन्ही स्त्रिया कुंती ,गांधारी आणि  पांचाली  तिघींचे रूप ह्या अपराजितेत मला दिसतात .

ज्याची एंट्री पहिली त्याची एक्सिट  हि पहिली  हा जगाचा सर्वसामान्य नियम, क्रम चुकवून होणारे मृत्यु  हे त्यांच्या दुःखाच्या  भळभळणाऱ्याजखमा कायमस्वरूपी  सोडून जातात ,कुमार दादाचा तिच्या मुलाचा  अकाली मृत्यू  अशीच एक जखम ,कायमचीच विव्हळ करणारी ,शेवट पर्यंत ती तिच्या बरोबर राहिली पण  कधीही तिने ती मिरवली नाही ,

ती कोण होती कशी होती ह्याचे एकाच उत्तर माझ्या कडे आहे म्हणजे ती विमल ताई होती.
अमर वेल नेहमी कुंपणावर लावतात तिची घट्ट वीण एवढी मजबूत असते की ती कुंपणाच्या आतल्याचे रक्षण करते कितीही तिला तोडा अमर वेल अमरच असते माझ्या मनातले अमर वेलीचा चेहरा विमल ताई चा आहे
शशांक









या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे

इंदुताई आणी गुरुदास मामा